बुलढाणा_Activities
केंद्र—प्रमुख प्रशिक्षण अहवाल
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तसेच विपश्यना विशोधन विन्यास (VRI), इगतपुरी (जि. नाशिक) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या 'मित्र' (Mind In Training For Right Awareness – MITRA) उपक्रमांतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील केंद्रप्रमुखांसाठी आनापानसती प्रशिक्षण कार्यशाळा दिनांक १९ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) बुलढाणा, जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक व माध्यमिक) आणि विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूट (VRI), इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
बुलढाणा जिल्ह्यात केंद्रप्रमुखांची एकूण १४० पदे असून प्रशिक्षण दोन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आले. सकाळच्या सत्रात (११.०० ते २.००) ३८ केंद्रप्रमुख तर दुपारच्या सत्रात (२.३० ते ५.३०) ३० केंद्रप्रमुख असे दोन्ही सत्र मिळून एकूण ६८ केंद्रप्रमुख प्रशिक्षणास उपस्थित होते.
कार्यशाळेच्या सुरुवातीला प्रशिक्षणार्थ्यांना मित्र अँप डाउनलोड करून देण्यात आले व त्यांची नोंदणी (Registration) करण्यात आली. त्यानंतर सर्व केंद्रप्रमुख व मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविकाद्वारे 'मित्र' उपक्रमाविषयी थोडक्यात माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचा मुख्य भाग म्हणून ऑडिओ ट्रॅकच्या माध्यमातून सुमारे ७० मिनिटांचे आनापानसती प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान सहभागी केंद्रप्रमुखांनी शांत, शिस्तबद्ध आणि एकाग्र वातावरणात आनापानसती ध्यानाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
त्यानंतर उपस्थित केंद्रप्रमुखांपैकी एकाने दिनांक ८ ऑगस्ट २०१९ रोजीच्या परिपत्रकाचे सामूहिक वाचन केले. शैक्षणिक परिषदेत करावयाच्या बाबी, शिक्षकांचे प्रशिक्षण कोणत्या पद्धतीने घ्यावयाचे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेदरम्यान आनापानसती ध्यानाची संकल्पना, साधनेची पद्धत, तिच्यामागील तत्त्वज्ञान तसेच शालेय स्तरावरील उपयुक्तता याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. दहा दिवसीय विपश्यना अभ्यासक्रमाबाबत आवश्यक माहिती देण्यात येऊन उपस्थितांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देण्यात आली.
कार्यशाळेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे तीन तासांच्या प्रशिक्षण कालावधीत सर्व केंद्रप्रमुखांनी उल्लेखनीय एकाग्रता, शिस्त, शांतता आणि सक्रिय सहभाग कायम ठेवला. प्रशिक्षणानंतर अनुभवकथन सत्रात सहभागी केंद्रप्रमुखांनी आनापानसती साधनेचा सकारात्मक अनुभव व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच एकाग्रता, मानसिक स्वास्थ्य आणि भावनिक संतुलनासाठी असे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रशिक्षणार्थ्यांनी दहा दिवसीय विपश्यना अभ्यासक्रमास सहभागी होण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद व्यक्त केला.
'मित्र' उपक्रमांतर्गत बुलढाणा जिल्ह्यात आयोजित केंद्रप्रमुखांचे आनापानसती प्रशिक्षण उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडले. प्रशिक्षित केंद्रप्रमुखांच्या माध्यमातून आगामी काळात जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये आनापानसती साधना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे शक्य होणार आहे. विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य, एकाग्रता, भावनिक संतुलन आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी 'मित्र' उपक्रम निश्चितच महत्त्वपूर्ण व प्रभावी ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
फोटो व व्हिडिओ — केंद्रप्रमुख प्रशिक्षण
👆 मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा
📌 प्रत्येक केंद्र अंतर्गत शिक्षण परिषदेची माहिती लवकरच उपलब्ध होईल.