वाशिम_Activities
केंद्रप्रमुख प्रशिक्षण अहवाल
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तसेच विपश्यना विशोधन विन्यास (VRI), इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या 'मित्र' (Mind In Training For Right Awareness – MITRA) उपक्रमांतर्गत वाशिम जिल्ह्यातील केंद्रप्रमुखांसाठी आनापानसती प्रशिक्षण कार्यशाळा दिनांक ६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० या वेळेत आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) वाशिम, जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक व माध्यमिक) आणि विपश्यना प्रचार व प्रसार समिती वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
वाशिम जिल्ह्यात एकूण ७४ केंद्रप्रमुखांची पदे असून, या प्रशिक्षणात ५१ केंद्रप्रमुख, ५ विस्तार अधिकारी, १ गट विकास अधिकारी व DIET चे प्राचार्य नरेंद्र महाजन सर असे एकूण ५८ जणांनी (२ महिला व ५६ पुरुष) सहभाग घेतला. विपश्यना आचार्य श्री. राजाभाऊ राऊत, श्रीमती प्रमिला राजाभाऊ राऊत व श्री. सुरेश भालेराव यांनीही प्रशिक्षणात उपस्थिती दर्शवली.
कार्यशाळेच्या सुरुवातीला प्रशिक्षणार्थ्यांना मित्र अँप डाउनलोड करून देण्यात आले व त्यांची नोंदणी (रजिस्ट्रेशन) करण्यात आली. त्यानंतर सर्व केंद्रप्रमुख व मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविकाद्वारे उपक्रमाविषयी थोडक्यात माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचा मुख्य भाग म्हणून ऑडिओ ट्रॅकच्या माध्यमातून ७० मिनिटांचे आनापानसती प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर उपस्थित केंद्रप्रमुखांपैकी एकाने ८ ऑगस्ट २०१९ च्या परिपत्रकाचे सामूहिक वाचन केले.
पुढे शैक्षणिक परिषदेत करावयाच्या बाबी, शिक्षकांचे प्रशिक्षण कशा पद्धतीने घ्यावयाचे याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली. कार्यशाळेदरम्यान आनापानसती ध्यानाची संकल्पना, साधनेची पद्धत, तिच्यामागील तत्त्वज्ञान तसेच शालेय स्तरावरील उपयुक्तता याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सहभागी केंद्रप्रमुखांनी शिस्तबद्ध व एकाग्र वातावरणात सलग तीन तास आनापानसती ध्यानाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला — हे या कार्यशाळेचे विशेष वैशिष्ट्य ठरले.
प्रशिक्षणानंतर अनुभवकथन सत्रात सहभागी केंद्रप्रमुखांनी आनापानसती साधनेचा सकारात्मक अनुभव व्यक्त केला. काही सहभागींनी ही साधना अंतर्मनाशी संवाद साधण्याची संधी, मन शांत व स्थिर करणारा अनुभव असल्याचे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. प्रशिक्षणार्थ्यांनी अनुभवपत्र व फीडबॅक फॉर्म भरून दिले तसेच १० दिवसीय विपश्यना कोर्सला जाण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला.
'मित्र' उपक्रमांतर्गत वाशिम जिल्ह्यात आयोजित केंद्रप्रमुखांचे आनापानसती प्रशिक्षण उत्साहपूर्ण व यशस्वीरित्या पार पडले. प्रशिक्षित केंद्रप्रमुखांच्या माध्यमातून आगामी काळात जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये आनापानसती साधना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे शक्य होणार आहे. विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य, एकाग्रता, भावनिक संतुलन आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी 'मित्र' उपक्रम निश्चितच महत्त्वपूर्ण व प्रभावी ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
फोटो व व्हिडिओ — केंद्रप्रमुख प्रशिक्षण
👆 मोठ्या आकारात पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा
📌 प्रत्येक केंद्र अंतर्गत शिक्षण परिषदेची माहिती लवकरच उपलब्ध होईल.



